रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील घटना
रावेर (प्रतिनिधी):- गावातील समाज मंदिरासाठी नियोजित असलेल्या जागेवर खड्डे का खोदता? असा जाब विचारल्याच्या रागातून एका तरुणावर लोखंडी अँगलने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना अहीरवाडी येथे घडली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहीरवाडी (ता. रावेर) येथील फिर्यादी राहुल ताराचंद लहासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील नियोजित समाज मंदिराच्या जागेवर आरोपी खड्डे खोदत होते. फिर्यादीने त्यांना याबद्दल विचारणा केली असता, आरोपींना त्याचा प्रचंड राग आला. दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीचा भाऊ कपिल याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. त्याच दिवशी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास रावेर ते केऱ्हाळा रोडवरील देशी दारूच्या दुकानासमोर मुख्य आरोपी नितीन वाघ याने इतर आरोपींच्या सांगण्यावरून कपिलला गाठले. यावेळी नितीनने हातातील लोखंडी अँगलने कपिलच्या डोक्यावर, छातीवर आणि हातापायांवर सपासप वार केले. या हल्ल्यात कपिल गंभीर जखमी झाला असून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणी राहुल लहासे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांनी १) नितीन पुंडलिक वाघ, २) मंदा विजय वाघ, ३) पंकज पुंडलिक वाघ आणि ४) लाडकाबाई पुंडलिक वाघ (सर्व रा. अहीरवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.









