महिला अन्याय विरोधी समितीने पुन्हा जुळविला संसार
अमळनेर(प्रतिनिधी)- पत्नीच्या बहिणीशी सूत जुळल्यानंतर पतीने आपल्या पत्नीसह ७ वर्षीय चिमुकलीला वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार दीड वर्षांपूर्वी घडला होता मात्र महिला अन्याय विरोधी समितीच्या सदस्यांनी केलेल्या तडजोडीमुळे या संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणण्यात यश आले आहे. त्यामुळे पती पत्नीमध्ये आलेला दुरावा यामुळे संपुष्ठात आला आहे .
अमळनेर येथील महिला अन्यायविरोधी समितीचे धनंजय सोनार यांच्याकडे विवाहायतेने तक्रार दिली होती. त्यानुसार समितीच्या सदस्यांनी दोघा पती पत्नीमध्ये समानव्यय घडवून आणला . पत्नीच्या बहिणीशी प्रेम संबंध निर्माण झाल्यानंतर पतीने पत्नी आणि लहानग्या मुलीला सोडून धुळे येथे सालीसोबत लग्न न करता संसार थाटला होता. मात्र समितीच्या सदस्यांनी दोघांना समजावून त्यांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी संसारात झालेली राखरांगोळी झाल्याचे मान्य करून तसेच दोन परिवारांमध्ये आलेले वितुष्ट हे दोघांच्या नोकरीवर गदा अनु शकते हे समजल्यानंतर त्यांनी सामोपचाराने यावर तोडगा काढला .
अखेर पंचांसमक्ष माफीनामा व चांगल्या वर्तणुकीचे लेखी घेतल्यानंतर विवाहिता नांदावयास गेली. यावेळी लहान बहिणीने पायावर लोळण घेत मोठ्या बहिणीच्या संसारात कधी व्यत्यय आणणार नाही, असे म्हणून दोघांनी माघार घेतली.
संसार सुरळीत होण्यासाठी अमळनेर महिला अन्यायविरोधी समितीचे धनंजय सोनार, नीशा विसपुते, वैशाली शिंदे, राजकुमार कोराणी, विनोद राऊळ, अनिल चौधरी, बाळकृष्ण शिंदे आदींनी पुढाकार घेतला. दरम्यान, अमळनेर महिला अन्यायविरोधी समितीने यापूर्वीदेखील अशा अनेक महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम केले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे .