मधुमेह, वजनवाढ यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास होणार मदत
जळगाव (प्रतिनिधी): शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या साखरयुक्त पेय व पदार्थांच्या सेवनामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची दखल घेऊन जिल्हा परिषद, जळगाव यांनी एक अभिनव व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये “नो शुगर” फलक लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या फलकांमध्ये विविध शीतपेयांमधील अॅडेड शुगरचे प्रमाण स्पष्टपणे दर्शविण्यात आले असून विद्यार्थ्यांना प्रक्रिया केलेल्या साखरेचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, प्रक्रिया केलेल्या साखरेपासून होणारे धोके पटवून देणे तसेच निरोगी जीवनशैलीकडे विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हा आहे.
साखरेचे अतिसेवन टाळल्यास मधुमेह, वजनवाढ यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. शाळेच्या पातळीवरच विद्यार्थ्यांमध्ये योग्य आहार शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी “नो शुगर” उपक्रम प्रभावी ठरणार आहे. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आरोग्यदृष्ट्या फायदेशीर, शाळांमध्ये वापरयोग्य आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दीर्घकालीन परिणामकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.