चोपडा तालुक्यातील अडावदजवळची घटना
चोपडा (प्रतिनिधी) : साग लाकडाची चोरटी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनमजुराला धक्काबुक्की करून चाकूहल्ला केल्याची घटना शुक्रवारी दिनांक १९ रोजी घडली. या प्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिब्राहिम राजू तडवी (वय ३०, रा. बिडगाव ता. चोपडा) हे वन क्षेत्रामध्ये रोपन संरक्षण मजूर म्हणून कार्यरत आहेत. वनक्षेत्रातील सागाचे लाकूड तोडून संशयित आरोपी दुचाकीने नेत असल्याचे तडवी यांच्या लक्षात आले. (केसीएन)त्यांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकी चालकाजवळ जावून तपासणी केली. त्याच्या गोण्यामध्ये सागवानी लाकडाचे तुकडे मिळून आले. तडवी यांनी संशयिताचे नाव विचारले असता नदिम बेग शेख (रा. अडावद) असे त्याने सांगितले.
दरम्यान, पुढील कारवाई करण्यासाठी तडवी हे संशयिताला सोबत चल असे म्हणाले. याचा राग येऊन संशयिताने तडवी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. संशयिताने त्याच्या कमरेचा चाकू काढत तो रोपन संरक्षण मजुराच्या उजव्या हातावर मारुन वार केला. याप्रकरणी तक्रारीनुसार अडावद पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल जयदिप राजपूत हे करीत आहेत.