रोजगारासाठी निघालेल्या परिवारावर काळाचा घाला, दीड वर्षाची मुलगी बचावली
एरंडोल तालुक्यात खेडी खडका परिसरात घडली घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरखेडे गावात एकाच मजूर परिवारातील ५ जणांचा अंत झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणाला रोहित्रातून विजेचा प्रवाह दिल्याने त्याचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून पोलीस अधीक्षकांसह तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.
विकास रामलाल पावरा (वय ३५, रा. मध्यप्रदेश) हा तरुण परिवारासह एरंडोल तालुक्यात कामासाठी आला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्याचा परिवार बुधवारी दि. २० रोजी मध्यरात्री तालुक्यात एरंडोल शहराच्या दिशेने चालला होता.(केसीएन)रस्त्यात खेडी खडका परिसरात रस्त्यात वरखेडे येथील शेतकऱ्याच्या शेतातून जात असताना या शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेताभोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता. या वीज प्रवाहाची कल्पना नसल्याने, मजुरीसाठी आलेल्या विकास पावरा एकाच याच्या कुटुंबातील ५ व्यक्तींना त्या तारेचा जबर धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा वीजप्रवाह बॅटरीतून सोडण्याऐवजी रोहित्रातून सोडल्यामुळे हि दुर्दैवी घटना घडली असावी अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. घटनेत २ मोठे रानडुक्कर देखील मयत झाल्याची माहिती मिळाली आहे. यातून वीजप्रवाह किती जोरात असेल याची कल्पना येते.
मृत्यू झालेल्यांमध्ये विकास रामलाल पावरा (वय ३०), त्याची पत्नी सुमन विकास पावरा (वय २५), तसेच त्यांची २ मुले पवन विकास पावरा (वय ४) आणि कंवल विकास पावरा (वय ३) तसेच विकासाची सासू वृद्ध महिला (नाव निष्पन्न नाही) यांचा समावेश आहे.(केसीएन)तर दुर्गा विकास पावरा (वय दीड वर्षे) हि घटनेतून बचावली आहे. सदर पावरा परिवार हा आंबेवडगाव ता. पाचोरा येथील रहिवासी असून त्यांचे मूळ गाव ता. खटना जि. बऱ्हाणपूर येथील आहे. हृदयद्रावक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. घटनेप्रकरणी शेतमालक बंडू युवराज पाटील (वय ६४, रा. वरखेडी ता. एरंडोल) यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते.
तर घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक मते, एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील, एरंडोलचे निरीक्षक निलेश गायकवाड, एपीआय रोहिदास गबाले यांच्यासह तहसीलदार प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. एरंडोल पोलीस स्टेशनचे कर्मचारी पंकज पाटील, राजू पाटील, संदीप पाटील यांनी मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्याकामी रवाना झाले आहे.