मुलांच्या गटात दक्ष गोयल आघाडीवर तर मुलींमध्ये बंगालच्या अग्रमानांकित मृत्तिका मल्लिकचे जोरदार पुनरागमन
जळगाव ( प्रतिनिधी ) – अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेली राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी खेळवण्यात आलेल्या नवव्या फेरीत अनेक रंगतदार सामने पहावयास मिळाले. आता स्पर्धा शेवटच्या दोन फे-यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पिछाडीवर वाटणाऱ्या अनेक खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत ‘अजून आम्ही स्पर्धेत आहोत’ असं म्हणत सर्वांना सावधान केले आहे.
मुलींच्या गटात आतापर्यंत महाराष्ट्राची संनिद्धी भट आगेकुच करत होती. मात्र परवा तिला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ती थोडी खाली गेली. मात्र आता स्पर्धेच्या सुरुवातीपासून चर्चेत असणारी प.बंगालची अग्रमानांकित मृत्तिका मल्लिक ने महिला फिडे मास्टर शुभि गुप्ताला पराभवाचा झटका देत पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. इटालियन गिको पियनो पद्धतीत झालेल्या या सामन्यात काळ्या सोंगट्यानिशी खेळताना शुभि ने घोडा व वजिराच्या बचावात्मक चाली चुकवल्या त्याचा फायदा घेत, मृत्तिका ने काळ्या राजावर जोरदार हल्ला चढवत अवघ्या ३३ चालितच डाव संपवला. दुसऱ्या पटावर संनिद्धी भटने स्कँडीनावियन ओपनिंगचा वापर करत मिडल गेम मध्ये घोडा विरुद्ध उंटाचा गुणात्मक फरक प्रबळ केला, पण अंतिम स्थितीत तुलनात्मक फरक नसल्याने दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. तिसऱ्या पटावर आमूक्ता गुंटकाने फिलिडोर ओपनिंग मध्ये साची जैन विरुद्ध मोकळ्या ‘डी’ पट्टीवर मोहऱ्याची मारामारी केल्याने जिंकण्याची संधी दोन्ही खेळाडूंनी गमावली आणि सरतेशेवटी डाव अनिर्णीत राहिला. चौथ्या पटावर कर्नाटकच्या अक्षया साथी ने सपर्या घोषचा पराभव करत आपले आव्हान कायम ठेवले.
मुलांच्या गटात पहिल्या पटावर जिहान शाहच्या वजिराच्या ड ६, उंटाच्या सी ३ जागेवरील अप्रतिम खेळ्यानंतर उंटाची सी ६ घरावरील कमकुवत चालीला पारसने वजिराच्या बाजूला राजा संरक्षित करत प्रतिहल्ला चढवला पण मिडलगेम मध्ये परिस्थिती तीन वेळा आल्याने बरोबरी घोषित करण्यात आली.
पण खरे बुद्धिबळ द्वंद्व पाहिला मिळाले ते दुसऱ्या पटावर, फ्रेंच विनौवर पध्दतीने खेळल्या गेलेल्या या डावात हत्तीच्या डी ६ चालीपेक्षा हत्ती ची ‘डी ७’ जागेवर खेळली गेलेली चाल मध्य प्रदेशच्या माधवेंद्राला महागात पडली. ह पट्टीतील प्यादे पुढे ढकलत दक्षने अजिंक्यपदाकडे वाटचाल सुरू केली आहे. तिसऱ्या पटावर महाराष्ट्राच्या कुशाग्र ने फिडे मास्टर इम्रानला वजीराच्या अंतिम स्थितीत बरोबरीत रोखले. चौथ्या पटावर आणि पाचव्या पटावर वत्सल सिंघला आणि अदक बीवोर यांनी अनुक्रमे विघ्नेश वेमुला व अनिरुद्धला मात देत निवड प्रक्रियेत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.
मुलांच्या गटात साडे सात गुणांसह दक्ष गोयल निर्विवाद आघाडीवर असून पाच खेळाडू ७ गुणांसह द्वितीय स्थानावर तर ४ खेळाडू साडे सहा गुणांसह तृतीय स्थानावर आहेत. अजिंक्यपद स्पर्धेमध्ये चुरस वाढत असून स्पर्धेचे विजेतेपद कोण मिळवेल याची उत्कंठा अजूनही ताणलेली आहे.
जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव नंदलाल गदियांनी दिल्या स्पर्धकांना शुभेच्छा…
नवव्या फेरीच्या सुरुवातीला जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव नंदलाल गदिया यांनी सहभागी स्पर्धकांशी संवाद साधला, त्यांनी सर्वांना उद्देशून म्हटले कि, सर्वांनी विद्यार्थिदशेचा पुरेपूर आनंद घ्या आणि आपल्या आवडत्या खेळात किंवा गोष्टीत मन लावून कार्य करा. यश अपयशला खेळ भावनेने घ्या. असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.