चोपडा उपजिल्हा रुग्णालय भेटीप्रसंगी दिल्या सूचना
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी शनिवारी चोपडा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली व विविध सूचना केल्या. यावेळी श्री अंकित यांनी उपलब्ध असलेल्या औषधसाठा, मनुष्यबळ तसेच रुग्णालयातील स्वच्छता, सोयीसुविधा याबाबत आढावा घेऊन निदर्शनास आलेल्या कमतरता येत्या आठ दिवसात भरून काढण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी शनिवारी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक सुरेश पाटील, पंकज पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी स्वतः औषध साठा तपासणी करून कोणकोणत्या प्रकारची किती औषधे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. सोबतच मनुष्यबळाची देखील यावेळी तपासणी करण्यात आली. संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आढळून आलेली स्वच्छता तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट बाबत तपासणी करण्यात आली. रुग्णालयात पुरेल इतका औषध साठा असल्याचे आढळून आले.