जळगावातील डॉक्टरसोबत घडली घटना, गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एका रुग्णालयातील वस्तूंचे नूतनीकरण करायचे असल्याने एका व्यक्तीला काम देण्यात आले होते. मात्र त्याने नवीन फर्निचर वगैरे काही तर नाहीच उलट रुग्णालयातील जुनेही अंदाजे १ हजार किलोचे भंगार काढून घेऊन गेल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला १ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहू नगर रस्त्यावर फिर्यादी डॉ. अनुज कृष्णा पाटील यांचा दवाखाना आहे. त्यांनी संशयित आरोपी संदीप साहेबराव पाटील (वय ४०, रा. रेणुका नगर, मेहरूण, जळगाव) याला त्यांच्या रुग्णालयातील वस्तूंचे नूतनीकरण करण्याचे असल्याने काम दिले होते. (केसीएन)संदीप पाटील याने नूतनीकरणासाठी काही वस्तू आणाव्या लागतील म्हणून डॉ. पाटील यांचेकडून ७५ हजार रुपये रोख घेतले. तसेच, रुग्णालयातील पलंग, रेलिंग व इतर भंगार साहित्य अंदाजे १ हजार किलोचे काढून संशयित संदीप पाटील हा घेऊन गेला. सदर प्रकार हा दि. १५ ते २१ ऑक्टोबर दरम्यान घडला होता.
याप्रकरणी डॉ. अनुज पाटील यांनी सुरुवातीला जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल होता. मात्र तरीही संदीप पाटील याने रुग्णालयातील काम करण्यासाठी न आल्याने अखेर डॉ. पाटील यांनी दि. ४ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे ७५ हजार रोख व भंगार ४० हजार रुपये असे १ लाख १५ हजार रुपयाची फसवणूक झाली असल्याची फिर्याद दिली आहे.(केसीएन) त्यानुसार संशयित आरोपी संदीप साहेबराव पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संदीप पाटील याने यापूर्वीदेखील काही ठिकाणी फसवणूक केली असल्याची माहिती मिळत आहे. प्रकरणाचा तपास हा पोहेकॉ रविंद्र पाटील हे करीत आहेत.