आता माझे वडील चोरताहेत : उद्धव ठाकरेंचा घणाघात
जळगावच्या सभेत केंद्र, राज्याच्या सत्ताधाऱ्यांवर जबरी टीका
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात रविवारी १० सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जबरदस्त टीका केली. भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (आरएसएस) सभेत लक्ष्य केले. रविवारी त्यांनी लोहपुरूष सरदार वल्लभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे या अनावरण केलं. यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरातमध्ये वल्लभभाईंचा सगळ्यात उंच पुतळा उभारण्यात आला, आज भाजपने तर नाहीच नाही, त्यांच्या मातृसंस्था आरएसएसने देखील आदर्श मानावं अशी व्यक्तीमत्वचं उभी केली नाहीत. मग केलं काय, तर चोरीचं काम. इकडे वल्लभभाई चोरून घ्या तिकडे नेताजी सुभाषबाबू चोरून घ्या. आता तर माझे वडिल चोरायला निघालेत, असा घणाघात त्यांनी केला.
राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्याने पक्षबांधणीसाठी मैदनात उतरले आहेत. या दरम्यान आज जळगाव दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील कडाडून टीका केली आहे. ज्यांचा स्वतंत्र्यलढ्यात सुतराम संबंध नव्हता अशी लोकं, या आदर्श लोकांच्या जोरावरती स्वतःची दहीहांडी करत आहेत. मुळात कर्तृत्व काही नाही. वल्लभभाईंचा पुतळा तीनशे फूट, हजार फूट बांधा, पण त्यांच्या कामाच्या उंचीच्या जवळपासही तुम्ही फिरकू शकत नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि जालना येथे झालेल्या मराठा आंदोलकांवर लाठीमार यामुळे राजकारण तापलं आहे. अशातच जळगावमध्ये सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जालन्यातील प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे. उध्दव ठाकरे सभेवेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांना सवाल करत, ‘येथील कोणते पोलिस आधिकारी आहेत त्यांनी सागावं तुमच्या मनाप्रमाणे शांततेत चाललेल्या एखाद्या आंदोलनात तुम्ही ताफा घुसवू शकता का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. असा बेछूट लाठीमार तुम्ही करू शकता का, आंदोलकावर अश्रुधूर तुम्ही सोडू शकता का, हवेत गोळीबार करू शकता का, काय असं त्यांचं चुकलं होतं? आंदोलनाला, उपोषणाला बसलेत. पण पोलिस आले आणि त्यांना दणादणा मारत सुटले.
ही परिस्थिती जशी ‘जालियानवाला बाग कांड’ झालं होतं, तसं हा नवा ‘जालनावाला’ घडविला आहे, सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे, असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. मराठा आंदोलनात मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. परंतू मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. असा अमानुष अत्याचार जालियनवाला येथे झाला होता आता नवा जालनावाला घडविला आहे’, अशी खोचक टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.