जळगाव (प्रतिनिधी) – विविध मागण्यांसाठी जळगावच्या रेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यासाठी आलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जगन सोनवणे आणि त्यांच्यासह सोळा कार्यकर्त्यांना शहर पोलिस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरपकड करीत अटक केली. दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करीत अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करीत सुटका केली.
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील तरुणी अत्याचार प्रकरणी जळगाव रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नियोजन होते. त्यानुसार शुक्रवारी दि. 9 ऑक्टोंबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे आणि त्यांचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच रेल्वे स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असतानाच शहर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले. तसेच आंदोलन न करण्याविषयी त्यांचे मनपरिवर्तन करून यापुढे आंदोलन करणार नाही असे आश्वस्त करून घेतल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत सुटका केली.
अटक करण्यात आलेल्या मध्ये जगन सोनवणे, बबलू सिद्दिकी, गोपी साळी, शंकर भोसले, नाना साळुंखे, विजय जावळे, शांताराम अहिरे, अय्युब शेख, सचिन बेहेरे, गुड्डू शेख, सईद शेख, राकेश बगन, हरीश सुरवाडे, रतन वानखेडे, विशाल पवार, राहुल साळुंखे अशा 16 जणांचा समावेश आहे.