जळगाव (प्रतिनिधी) :- येथील रोटरी क्लब जळगावच्या वतीने शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, सूत्रधार, निवेदक असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीरंग गोडबोले यांचे “मराठी मनोरंजन विश्व : काल, आज आणि उद्या” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. रोटरी क्लबच्या गणपती नगरातील सभागृहात होणारे हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून जळगावकरांसाठी उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष मनोज जोशी यांनी केले आहे.
श्रीरंग गोडबोले यांनी नाटके, मालिका, गीते लिहिली आहेत आणि दिग्दर्शितही केली आहेत. गेली चार दशके गोडबोले मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. बालनाट्यापासून राजकीय विनोदापर्यंत सर्व प्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती अशा मनोरंजन उद्योगाच्या चारही बाजू ते समर्थपणे सांभाळत आहेत. मोहन आगाशे, जब्बार पटेल आदींच्या सहवासात सुरू झालेला त्यांचा कलाप्रवास ‘इंडियन मॅजिक आय’ या निर्मिती संस्थेपर्यंत आला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि लेखनातही असलेला नर्मविनोदाचा प्रवाह अधिक उठावदार आहे. ग्रिप्स थिएटरसाठी लिहिलेल्या बालनाट्यापासून ‘पिंपळपान’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘इडियट्स’, ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘पुणे ५२’ असा त्यांचा सर्वसंचारी प्रवास आहे.