अँड.रोहिणी खडसे – खेवलकर यांनी आयजींकडे केली मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असून अवैध धंदे जोरदार सुरु आहेत. काही गुन्हेगार नकली तहसीलदार बनून लोकांना, अधिकाऱ्यांना धमकवतात, हफ्ते वसुली करतात. यामुळे संत मुक्ताईंचा तालुका असलेल्या मुक्ताईनगरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे. लोकप्रतिनिधी म्हणून तक्रारी येत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन अँड. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे आज केली आहे.
आयजी दिघावकर हे बुधवारी जिल्हा पोलीस दलाच्या बैठकीसाठी आणि पाहणीसाठी जळगावात आले आहेत. त्यावेळी दुपारी अँड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांना मुक्ताईनगर तालुक्यात सुरु असलेल्या सट्टे, पत्ते, जुगार तसेच अवैध धंदे बोकाळल्याची तक्रार केली. तसेच स्थानिक पोलिसांवर दबाव आणून कार्यकर्त्यांवर विनाकारण गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे देखील दाखल केले जात असल्याचे सांगितले. काही गुन्हेगार अधिकारी, व्यावसायिकांना त्रास देत असून त्यांना धमकवत पैशांची मागणी करतात. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संत मुक्ताईच्या तालुक्यात गंभीर बनला असल्याचे अँड. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी सांगितले.
कायदे कुठे योग्य बसतात व कुठे अयोग्य हे वकील या नात्याने मला कळते. म्हणून कारवाई व्हावी, असेही त्या म्हणाल्या. आयजी दिघावकर यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन अँड. रोहिणी खडसे – खेवलकर यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, अजय जैन उपस्थित होते.







