जामनेर तालुक्यात शनिवारी घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यात गंगापूरी रस्त्यावर शनिवारी भरधाव मिक्सर वाहनाने दिलेल्या धडकेत रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी मिक्सर वाहनचालकावर जामनेर पोलीस स्टेशन येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळहून जामनेरकडे येत असलेल्या प्रवासी रिक्षाला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मायलेकीसह तीनजण ठार, तर पाचजण जखमी झाले. ही घटना शनिवारी दि. १३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडा दरम्यान घडली. मिक्सर ट्रक (क्र. एमएच १९-सीएक्स-२१८१) या गाडीने पियाजो रिक्षा (क्रमांक एमएच-१९-व्ही-३७०४) ला जबरदस्त धडक दिली. रिक्षात एकूण ८ प्रवासी बसलेले होते. तेव्हा ही घटना घडली. मृतांमध्ये सरला गोपाळ निंबाळकर (४२) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोन्ही रा. चिंचखेड बुद्रुक, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा समावेश आहे. याप्रकरणी मिक्सर वाहनचालक गोपाळ राजाराम बारी (वय ५९, रा. फेकरी दीपनगर, भुसावळ) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









