एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील नेहरु नगरातील एका गोडावूनमधून तेथेच काम करीत असलेल्या रिक्षाचालकाने मालकाच्या अपरोक्ष चिवडा, मुरमुऱ्याचे पाकिटे असलेले बॉक्स लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली दिनेश वाणी (वय ४२, रा. मोहन नगर, जळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्या बालाजी नमकीनची एजन्सी चालवितात. त्यांचा एजन्सीचा माल हा नेहरूनगरातील दत्त मंदिराजवळ भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो. एजन्सीच्या कामासाठी ३ चालक व ६ हेल्पर हे काम करतात. दि. ७ ऑक्टोबर रोजी त्या दुपारी साडेबारा वाजता गोडाऊनवर आल्या असता, तेथे त्यांच्याकडे कामाला असलेला रिक्षा चालक सचिन मुकुंदा साळवे, रा. खंडेराव नगर, जळगाव हा गोडाऊनच्या मागील बाजूने नमकिनचा माल काढत असताना दिसला.
त्याला फिर्यादीने विचारणा केली असता, त्याने, माझी चूक झाली. असे करणार नाही, म्हणाला. तसेच त्याने यापूर्वीही मालाची चोरी केली असल्याची माहिती फिर्यादी वैशाली वाणी यांना दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला १ लाख ६० हजार रुपयांचे नमकीन पाकिटांचे बॉक्स चोरल्याप्रकरणी सचिन साळवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहे.