फैजपूर-आमोदा मार्गावरील घटना : दोन्ही वाहने झाली पलटी
जळगाव/अमोदा (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावर रविवारी १ ते दीड वाजेच्या सुमारास मालवाहू रिक्षा आणि प्रवासी रिक्षा यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली. यात ट्युशनला जात असलेली सावदा येथील एका डॉक्टरांची १२ वर्षाची मुलगी जागीच ठार झाली आहे. तर इतर २ विद्यार्थ्यांसह एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. फैजपूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अदिती सोपान खडसे (वय १२, रा. सावदा ता. रावेर) असे मयत बालिकेचे नाव आहे. सावदा येथील दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची ती कन्या आहे. अदितीच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ असा परिवार आहे. रविवारी दि. ४ रोजी प्रवासी रिक्षा (क्रमांक एमएच १९ सीडब्लू ३५९०) ही प्रवाशांना आणि ट्युशनला जाणाऱ्या डॉक्टरांच्या मुलांना घेऊन आमोदा येथून फैजपूरकडे येत होती.(केसीएन)तेव्हा फैजपूरकडून आमोदाकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच १९-७०६४) ने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही वाहने पलटी झाली आहेत. या अपघातात डॉ. सोपान खडसे यांची कन्या अदिती सोपान खडसे हीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर डॉक्टर शंतनु सरोदे यांच्या मुलाला किरकोळ खरचटले असून आणखी एक ओझल नामक मुलीला भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर अजून एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने फैजपूर पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे स्थानिक रुग्णालयात हलवले आहे. घटनास्थळी फैजपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले आहे. (केसीएन)मयत अदितीचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहेत. यावेळी रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक डॉक्टरांनी एकाच गर्दी केली. सावदा गावावर शोककळा पसरली आहे.