मुंबई (वृत्तसंस्था) – संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्यादरम्यान काल भेट झाल्याचे वृत्त आल्याने महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानावर पोहचले आहेत. दोघांमध्ये राज्यातील प्रश्न आणि सध्या सुरु असणारी परिस्थिती यावर चर्चा होणार आहे.
दरम्यान, या भेटीबाबतची माहिती माध्यमांमध्ये झळकल्यानंतर राऊत व फडणवीस या दोन्ही नेत्यांनी भेटीमध्ये राजकीय चर्चा न झाल्याचा दावा केला आहे. राऊत व फडणवीस यांच्यादरम्यान झालेली भेट सामनातील मुलाखतीसाठी होती असं सांगण्यात येत असलं तरी या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अलर्ट झाल्याचं दिसतंय.
अशी झाली भेट
सांताक्रुझच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये शनिवारी दुपारी १.३० ते ३.३०दरम्यान संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली. नंतर माध्यमांमध्ये ही भेट झाल्याची माहिती झळकल्यानंतर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी भेट झाल्याचे वृत्त स्वीकारले. मात्र या बैठकीमध्ये सामानातील मुलाखतीबाबत चर्चा झाली, राजकीय चर्चा झाली नाही असे सांगण्यात आले.
शिवसेना – भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये अग्रणी भूमिका बजावलेल्या संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाल्या आहेत.