जळगाव (प्रतिनिधी)- तालुक्यांमध्ये स्वतःधान्य दुकानांमध्ये शासकीय गोदामातून येणारा धान्याचा माल हा कमी भरलेला असतो. अश्या तक्रारी दुकानदारांच्या वाढल्या असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, तसेच कमी भरत असलेला माल नेमका जातो कुठे? याची चौकशी होण्याची मागणी रेशन दुकानदारांमधून होत आहे.
तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे एका स्वस्त धान्य दुकानांमध्ये रविवारी ११ रोजी आलेल्या धान्याच्या मालाची वजन करून पाहिले असता, ५० किलो गोणीमागे ते १ ते २ किलोंनी कमी भरले आहे. जळगावच्या पुरवठा विभागाने याबाबत प्रत्यक्ष वजन करून पंचनामा केला आहे. एका दुकानात जर अनेक क्विंटल माल जात असेल तर किती गोण्यांमध्ये किती किलोचा माल कमी भरला जातो हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा अपहार होत असल्याची शक्यता दिसून येत आहे.
जळगाव तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकान सुमारे २०० च्या वर आहेत. एका दुकानात जर शेकडो किलो धान्य वजनात कमी भरत असेल तर २०० च्या वर दुकानांमध्ये किती धान्य कमी भरत असेल, याची कल्पना केली तर, खूप मोठा धान्याचा अपहार होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
यासंदर्भात, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्वरित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रेशन धारकांकडून होत आहे. ५० किलोमागे १ ते २ किलो धान्य कुठे जाते याची सखोल चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी आता तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून होत आहे.