जळगाव तालुक्यात धोबी वराड गावी घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धोबी वराड या गावांमध्ये वाळू खाली करून निघत असताना बस स्टँड ते मराठी शाळा दरम्यान भरधाव धडक देऊन डंपरखाली चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. २८ मार्च रोजी संध्याकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


बशीरशहा मगबुलशा फकीर (वय ७५, रा. धोबी वराड ता. जळगाव)असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते गावामध्ये परिवारासह राहत होते. ते संध्याकाळी एका कामानिमित्त मराठी शाळेकडे गेले होते. त्याच वेळेला (एमएच ४७ ए एस ९५४८) हा डंपर मराठी शाळेत वाळू खाली करून रिकामी डंपर भरधाव वेगाने घेऊन जात होता. रस्त्यात या डंपर चालकाने बेदरकारपणे बशीरशहा यांना धडक देऊन चिरडले. त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी जमा झाली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना घटना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी डंपर ताब्यात घेऊन तो पोलीस स्टेशनला जमा केला आहे. तर चालकाला ताब्यात घेण्याचे काम सुरू होते. वृद्धाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात मयत बशीरशहा यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान जळगाव तालुक्यामध्ये वाळू माफियांचा सुळसुळाट झालेला आहे. “केसरीराज” ने वारंवार याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहेत. मात्र महसूल प्रशासनाने सातत्याने त्यांच्याकडे कानाडोळा केल्यामुळे नागरिकांना जिवानिशी जावे लागत आहे. वाळू माफियांचा तात्काळ बंदोबस्त करावा. नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहेत.








