खिर्डी खुर्द येथे १६० महिलांना साड्या वाटप
खिर्डी रास्त भाव धान्य दुकानात साडी वाटप; महिलावर्गातून होतोय योजनेचा कौतुक
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे शनिवारी रास्त भाव धान्य दुकानात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी वाटप करण्यात आली. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील २४ लाख ५८ हजार ७४७ अंत्योदय कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून याबाबत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने संदर्भातील शासन निर्णय जारी केला होता.
या योजनेच्या माध्यमातून खिर्डी खुर्द येथील रास्त भाव धान्य दुकान क्रमांक – ६० येथे गावातील सुमारे १६० अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति कुटुंब एका साडीचे मोफत वाटप येथील धान्य दुकानदार कैलास तायडे, सरपंच राहुल फालक, पोलिस पाटील प्रदिप पाटील, उपसरपंच पुष्पाताई पाटील तसेच तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील ग्रामपंचायत सदस्य राहुल बढे, सदस्या जयश्री कोचूरे यांच्या हस्ते करण्यात आले. योजनेचा अंत्योदय शिधापत्रिकाधारक सर्वत्र कौतुक करीत आहे. या वेळी कांतीलाल गाढे, सादिक पिंजारी, भिमराव कोचूरे तसेच गावातील महिलावर्ग व सुज्ञ नागरिक उपस्थित होते.