भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील कंडारी येथे एका रेशनच्या धान्य दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून त्यातून २१ गव्हाचे पोते तसेच इलेक्ट्रॉनिक तोल काटा चोरून नेल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. १३ जुलै रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विजय आत्माराम मेढे (वय ४५, रा. म्हाडा कॉलनी, भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या कंडारी गावातील उषात्मा बहुउद्देशीय संस्थेच्या रेशन धान्य दुकानात ही घटना घडली आहे.(केसीएन)अज्ञात चोरट्यांनी शुक्रवार दि. १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपासून ते शनिवारी दि. १३ जुलै रोजी मध्यरात्री कधीतरी दुकानात अनधिकृत प्रवेश करून २१ गव्हाचे पोते सुमारे प्रत्येकी ५० किलोग्रॅमचे आणि साडेचार हजार रुपयांचा इलेक्ट्रॉनिक तोल काटा असा १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रमाणे भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक विकास बाविस्कर करत आहेत.