जळगावच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) : रेल्वेत चढताना तोल जाऊन पडल्याने पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरातील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे येथे मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
चेतन उर्फ जय दिनेश पाटील (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. रेमंड कंपनीतील दिनेश रामभाऊ पाटील यांचा तो मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.(केसीएन) चेतन हा गेल्या काही दिवसांपूर्वीच पुणे येथील एका कंपनीत नोकरीला लागला होता. मंगळवारी सायंकाळी तो रेल्वेत चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडील मोबाइलवरील क्रमांकावरून चेतन याच्या मामाला घटनेची माहिती दिली. यानंतर चेतन याच्या परिवाराला अपघाताची माहिती देण्यात आली. त्याचा मृतदेह बुधवारी दुपारी जळगावात आणण्यात आला. त्यावेळी आई, वडील आणि नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.