जळगाव तालुक्यात शिरसोलीदररम्यान घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर दर्शनाला जात असलेले अकोला जिल्ह्यातील वारकरी यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि. १९ रोजी जळगाव ते शिरसोली स्थानकादरम्यान घडली. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शंकर नामदेव राऊत (वय ६८, रा. दानापूर, जि. अकोला) असे मयत वारकऱ्यांचे नाव आहे. त्यांचा मुलगा मंत्रालयात कामाला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस नाईक धनराज पाटील, गुलाब माळी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. सुरुवातीला मृताची ओळख पटली नव्हती.(केसीएन) नंतर आधार कार्डावरून मृताची ओळख पटली व त्यांचे नाव शंकर राऊत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृताच्या मुलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शंकर राऊत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला दर्शनासाठी जात होते, अशी माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिली. मात्र, पंढरपूरला पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.