जळगावातील घटना, बामणोद येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. १५ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोकेश रविराज मराठे (१७, रा. बामणोद ता. यावल) असे मयत मुलाचे नाव आहे. लोकेश एक वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने त्याला बामणोद येथे महानुभव पंथाच्या आश्रमात ठेवले. तेथे त्याच्या गुरुचेही निधन झाले. त्यानंतर हा तरुण इतरत्र कामे करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, सोमवारी तो नाशिककडून भुसावळकडे येत असताना रेल्वेतून जळगावजवळ तो खाली पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सचिन भावसार, पोलिस नाईक नरेंद्र चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याची माहीती बामणोद येथे मिळताच तेथील नागरिकांनी जळगाव येथे धाव घेतली. दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे बामणोद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.