भुसावल विभागातर्फे विशेष उपक्रमांचे सादरीकरण
जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय रेल्वे परिवर्तन, कार्यक्षमता आणि शाश्वततेचे १०० वर्षांचे प्रतीक म्हणून रेल्वे विद्युतीकरणाचे शतक अभिमानाने साजरे करत आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे स्मरण करण्यासाठी, भुसावळ विभागाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. भुसावळ मंडळात ‘रेल्वे विद्युतीकरणाचे १०० वर्ष’ हा महत्त्वपूर्ण टप्पा भुसावळ रेल्वे स्थानकावर एका आकर्षक प्रदर्शनीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय प्रमुख म्हणून उपस्थित होते. या समारंभाला विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार सुमन, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक एम के मीना, वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
हा टप्पा रेल्वे पायाभूत सुविधा आणि कामकाजातील प्रगतीतील सातत्य अधोरेखित करतो, त्यामुळे वाहतूक अधिक पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम बनते. अनेक आव्हानांवर मात करून, या प्रयत्नांमुळे ऑपरेशनल कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारली असून पर्यावरणीय शाश्वततेला हातभार लागला आहे. या प्रदर्शनीमध्ये विविध इंजिन मॉडेल्स तसेच ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशनशी संबंधित विद्युत उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. रेल्वे विद्युतीकरणाच्या १०० वर्षांची कहाणी सांगणाऱ्या एका लघुपट दाखविण्यात आले.
विशेष आकर्षण म्हणून एका इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचा लघु मॉडेल प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये लोकोमोटिव्हच्या गतीनुसार सिग्नलच्या पहलूमध्ये वास्तववादी बदल दिसून येतो, जे अत्यंत प्रभावी ठरत आहे. तसेच, स्टीम लोकोमोटिव्हपासून इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हकडे झालेल्या प्रवासावर आधारित एक माहितीपटदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाच्या उपलब्धींचे सादरीकरण या प्रदर्शनीत करण्यात आले आहे. विद्युतीकरण शताब्दी साजरी करण्यासाठी विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर रोषणाई करण्यात आली. रेल्वे शालेय विद्यार्थ्यांसाठी रेल्वे विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर एक विशेष चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले. भुसावळ विभागाला या कामगिरीचा खूप अभिमान आहे आणि रेल्वे पायाभूत सुविधा आणि शाश्वत वाहतूक उपायांमध्ये पुढील प्रगतीसाठी वचनबद्ध आहे.