जळगाव ते शिरसोली दरम्यानची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जळगाव ते शिरसोलीदरम्यान रेल्वे रुळावर एका वृद्धाचा मृतदेह आढळला आहे. अनोळखी वृद्धाने रुळावर झोपून आत्महत्या केली असावी असा पोलिसांना अंदाज आहे. घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली असून मृताची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिरसोली ते जळगाव दरम्यान डाऊन रेल्वे ट्रॅकवर दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झोपून कुणीतरी अज्ञात वृद्धाने आत्महत्या केल्याची माहिती लोको पायलटने उप स्टेशन प्रबंधक, जळगाव यांना त्यांच्या व्हिएचएफ सेटवर कळवली. त्या माहितीच्या आधारे उप स्टेशन प्रबंधक एम. एल. रोडगे यांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला माहिती दिली.
त्यानुसार अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. आत्महत्या करणा-या इसमाचे अंदाजे वय ६० ते ६५ वर्ष असून उंची अंदाजे साडेपाच फुट आहे. तसेच अंगात पांढ-या रंगाचा शर्ट, पांढ-या रंगाची बंडी व त्याच रंगाचे धोतर व अंतर्वस्त्र परिधान केले आहे. मयताची ओळख पटवण्यासाठी कुणाला काही माहिती असल्यास जळगाव तालुका पोलिस स्टेशनला ०२५७-२२५३००२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.