जळगाव रेल्वेस्थानकावरील थरार
जळगाव (प्रतिनिधी) :- सुरत येथून ओरिसा येथे निघालेले एक वृद्ध जळगाव स्टेशनवर काही वस्तू घेण्यासाठी उतरले होते. त्यावेळी अचानक रेल्वेगाडी सुरु झाली. घाईघाईत रेल्वेच्या डब्यात चढत असताना या वृद्धाचा पाय घसरला आणि ते रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये त्यांचा पाय अडकून ते गंभीर जखमी झाले. हि घटना मंगळवारी २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.
नारायण दास आसुदनी (वय ६७, रा. पुरी, ओरिसा) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते त्यांची पत्नी सीमा देवी असुदानी यांच्यासह सूरत येथून ओरिसा राज्यातील पुरी येथे पुरी एक्सप्रेसमधून निघाले होते. दरम्यान मंगळवारी दुपारी १२ वाजता जळगाव रेल्वे स्टेशन आले असता ते काहीतरी वस्तू घेण्यासाठी खाली उतरले. तर त्यांच्या पत्नी या बर्थ वर झोपलेले होत्या. काही वेळाने रेल्वे गाडी सुरू झाली. त्यावेळी डब्यात बसण्यासाठी गडबडीने नारायणदास हे चढायला लागले.
त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि ते प्लॅटफॉर्म आणि रेल्वे या दोघांच्या मध्ये त्यांचा डावा पाय अडकला. त्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी रेल्वे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना प्लॅटफॉर्मवर ओढले.
त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान रेल्वे पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.