जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शिवकॉलनी उड्डाणपूल परिसरात रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या मयत व्यक्तींची ओळख पटविण्याचे आवाहन रामानंदनगर पोलिसांनी केले आहे.
मयताचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्ष असुन मजबूत जाडसर बांधा , रंग गोरा, उंची १६० सेंटीमीटर तर अंगात निळी जीन्स पँट व पांढऱ्या रंगाचा नक्षी असलेला शर्ट तसेच पांढरा बनियान व तपकिरी रंगाची अन्डर पँट असे मयताचे वर्णन आहे. घटनास्थळी मयताची स्पार्क कंपनीची चप्पल तसेच पांढरा हातरुमाल सापडला आहे.
शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळ अप रेल्वेलाईनवर खंबा क्रमांक ४१७ /२०- १८ जवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती शिरसोली येथील स्टेशन मास्तर कमलेश सिन्हा यांनी रामानंदनगर पोलिसांना कळविली. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पो ना जितेंद्र तांबडे , पो. कॉ.इकबाल पिंजारी , पंकज पाटील यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.जळगाव रेल्वे स्टेशन उपप्रबंधक यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना जितेंद्र तावडे करीत आहेत.