मुंबई (वृत्तसंस्था) – उत्तरप्रदेशातील हाथरस हत्याकांडात बळी पडलेल्या मृत पीडितेच्या घरी जात असताना कॉंग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारकडून रस्त्यावरच अडवले गेले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणाचा देशभरातून निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
राहुल गांधी यांना कोणीही धक्काबुक्की केली नाही. मात्र त्यांना जास्त गर्दीत फिरायची सवय नाही. त्यामुळे ते पडले. विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दानवेंच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हाथरस प्रकरणात चौकशी सुरू आहे. जर आवश्यकता पडल्यास सीबीआय चौकशी करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. याचा गुन्हेगार कोणीही असेल त्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दानवे यांनी राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. गर्दीतून जात असताना त्यांचा तोल गेला असावा. एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्हीदेखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो. तिथे नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी असते, त्यामुळे कदाचित अस झाले असावे, असे म्हंटले होते.