पालेभाज्यांपासून साकारलेल्या सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या ठरल्या आकर्षण
रावेर (प्रतिनिधी) – एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पंचायत समिती, रावेर यांच्या मार्फत रावेर येथे मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी पाककृती स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी स्थानिक परिसरातील उपलब्ध पदार्थांपासून पौष्टिक व स्वादिष्ट पाककृती तयार करून त्यांचे आकर्षक प्रदर्शन मांडले. विशेषतः टी एच आर (घरपोच आहार) पासून तयार करण्यात आलेल्या पाककृतींना मान्यवरांनी विशेष दाद दिली. तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनही या ठिकाणी पाहायला मिळाले.
कार्यक्रमात कडधान्य व पालेभाज्यांपासून साकारलेल्या सामाजिक संदेशवाहित रांगोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “१००० दिवसांचे महत्त्व”, “एक पेड मा के नाम”, “पोषण मटका” यांसारख्या थीमवर आधारित रांगोळ्या उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरल्या. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण “पोषण परी” हे होते.
सीईओ करणवाल यांनी टी एच आर आधारित पाककृती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले.