उत्कृष्ठ रूग्ण सेवा केल्याने होणार सन्मान
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटना दरवर्षी आपल्या संघटनेतील उत्कृष्ट कार्य केलेल्या दोन डॉक्टर बांधवांना डॉ.”सॅम्युअल हॅनिमन सेवा गौरव” पुरस्काराने सन्मानित करते. यावर्षी हा पुरस्कार डॉ.सुधाकर धर्मा चौधरी, निंभोरा व डॉ.सुनील रामकृष्ण कोल्हे, खिर्डी या दोघांना जाहीर झाला आहे. दि. २६ जानेवारी मंगळवार रोजी रावेर तालुक्याचे आ. अमोल जावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल.
डॉ.विजय माधव धांडे, अध्यक्ष रावेर तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटना, रावेर यांच्या अध्यक्षतेखाली रावेर येथे संघटनेच्या पारिवारीक स्नेह मेळाव्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या दोघांनी सुमारे ४० वर्षाच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेत वेगवेगळ्या प्रकारचे रोग निवारक शिबिर, हेल्थ चेकअप,जनजागृती पर व्याख्याने आयोजित करून, रंजल्या गांजलेल्या लोकांची नेहमी सेवा केली आहे. ज्या ज्या वेळी शासनावर आरोग्य सेवेचा ताण आला आहे, त्या त्या वेळी उस्फूर्तपणे रावेर तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटनेच्या डॉक्टरांनी नेहमीच मदतीचा हातभार लावला आहे. यांनी केलेल्या सेवेचा नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा, त्यांना सुद्धा यातून चालना मिळावी, या डॉक्टरांनी केलेल्या सेवाभावी कार्याचे कौतुक व्हावे, समाज मनात यांचे कार्य पोहोचावे यासाठी दरवर्षीय हे पुरस्कार दिले जातात. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ.विजय धांडे, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद कात्रे, डॉ. संगीता महाजन, सचिव डॉ.कमलाकर चौधरी, खजिनदार डॉ.सुनील यांनी केले आहे.