आंदलवाडी गावाजवळ पुरात वाहून गेल्याने प्रौढ बेपत्ता
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. मुंजलवाडी ते कुसुंबा रस्त्यावर वादळाने झाड कोसळल्याने यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. तर आंदलवाडी येथे पुराच्या पाण्यात एक जण वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे.
आंदलवाडी येथे रक्षाबंधननिमित्त झावरू उर्फ बाळू वसंत तायडे (४५, रा. अट्रावल ता. यावल) आले होते. शुक्रवारी रेल्वेचा पूल ओलांडून येत असताना अचानक पाठीमागून आलेल्या रेल्वेगाडीखाली चेंगरण्याच्या भीतीने खाली उडी मारल्याने सुकी नदीच्या पुरात वाहून बेपत्ता झाला आहे. शुक्रवारी दिवसभर राबवलेल्या शोध मोहीमेत यश हाती आले नाही. घटनास्थळी तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे यांनी भेट देऊन पाहणी केली.
शुक्रवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या दरम्यान बदा मंगू सोलंकी (वय ४४ रा. खडकीनदीजवळ, रा झिरण्या म. प्र.) व त्यांचा मुलगा रावेरकडून गावी मोटारसायकल (क्र एम.पी १०/एम. एक्स. ०६६०) ने परत जात असताना पाऊस सुरू झाल्याने मुंजलवाडी ते कुसुंबा रस्त्यावर निंबाच्या झाडाखाली थांबले. वादळाने झाडच उन्मळून पडल्याने यात दबून बदा मंगू सोलंकी यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा जखमी झाला आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मृत बदा सोलंकी याचे शवविच्छेदन करण्यात आले. खिरोदा यावल मंडळात ६८ मि.मी, पाल मंडळात ४६ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सावदा मंडळात २८ मि.मी, निंभोरा बु १८ मि.मी, रावेर १५ मि.मी, केऱहाळे १४ मि.मी, खिर्डी १३ मि.मी, ऐनपूर १२ मि.मी तर खानापूर मंडळात सर्वात कमी ५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.