रावेरच्या खून प्रकरणातील सत्य समोर, फिर्यादीने दिली धक्कादायक माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर शहरामध्ये तीन वर्षाच्या मुलीला लाकडी दांड्याने मारहाण करून तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी सावत्र बापासह सख्या आईवर गुन्हा दाखल झाला आहे यात दोघांनाही अटक झाली असून ते पोलीस कोठडीत आहेत. आता या खुनामागील कारणही समोर आले आहे. वैवाहिक संसारामध्ये दोन्ही मुले अडसर ठरत असल्यामुळे त्यांना सावत्र बापाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यात मुलगा बचावला तर चिमुरडीला मात्र प्राण गमवावे लागले अशी माहिती आता समोर आली आहे.
घटनेतील फिर्यादी तथा मयत चिमुरडीचे वडील भारत म्हसाने यांच्याकडून “केसरीराज”च्या प्रतिनिधीने माहिती जाणून घेतली. त्यावेळेला या धक्कादायक खुनामागील सत्य समोर आले आहे. भारत म्हसाने हे बऱ्हाणपूर जिल्ह्यात वारोली येथे राहतात. त्यांचा संशयित आरोपी माधुरी हिच्यासोबत २०१७ साली विवाह झाला आहे. एक वर्षापूर्वी किरकोळ वादातून माधुरी म्हसाने ही तिच्या माहेरी मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे दोन्ही मुलांना घेऊन निघून गेली होती. दि. १८ एप्रिल २०२४ रोजी फिर्यादी भारत म्हसाने हे त्यांची पत्नी माधुरी हिला घेण्यासाठी गेले असताना तिने येण्यास नकार दिला होता.
त्यानंतर पुढील पंधरा दिवसातच माधुरी म्हसाने हिने पती भारत म्हसाने यांना कुठलीही फारकत न देता थेट रावेर येथील नवीन बौद्ध वाडा येथे राहणाऱ्या अजय शांताराम घेटे याच्याशी विवाह केला. विवाहनंतर देखील माधुरी व भारत यांची दोन्ही मुले पियुष भारत म्हसाने (वय ५) आणि आकांक्षा भारत म्हसाने (वय ३) हे रावेर येथे माधुरी हिच्यासोबतच राहत होते. दरम्यान, काही दिवसातच अजय घेटे याला माधुरीच्या मुलांचा तिरस्कार व्हायला लागला. माधुरी सोबतच्या वैवाहिक संसारामध्ये अडसर ठरत असलेल्या पियुष व आकांक्षा या दोन्ही लहान मुलांना अजय घेटे हा मारहाण करत असे. त्यांना रात्री घराबाहेर झोपवत असे. त्यांचा अजयने छळ चालवला होता, अशी माहिती लहानग्या पियुषने त्याचे वडील भारत म्हसाने यांच्याकडे दिली आहे.
अखेर तो काळा दिवस उगवला
राहुल घेटे याने अखेर टोकाचे पाऊल उचलले. शुक्रवारी दि. ३१ मे रोजी सकाळी ९ वाजेपूर्वी कधीतरी त्याने माधुरी हिच्या दोन्ही मुलांना मारहाण करायला सुरुवात केली. यात मुलगा पियुष हा जीव वाचवत घराच्या बाहेर पळत सुटला. पण तीन वर्षाची आकांक्षा ही मात्र अजयच्या तावडीत सापडली. लाकडी दांडक्याने त्याने तिला मारहाण केली. तसेच हातापायांवर भीषण मारहाण करून गळा आवळला. तसेच आकांक्षाच्या शरीरावर सिगारेटचे चटके देखील दिले. यामध्ये आकांक्षा मात्र मयत झाली.
अजयच्या पत्नीला म्हणजेच आकांक्षाच्या आई माधुरी हिला आकांक्षाच्या मृत्यूबद्दल समजताच तिने पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने आकांक्षाला बेलसवाडी येथे घेऊन आली. त्या ठिकाणी मात्र गावातीलच एकाने फिर्यादी तथा आकांक्षाचे वडील भारत म्हसाने यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर भारत म्हसाने व त्यांच्यासोबतचे नातेवाईक यांनी बेलसवाडी येथे येऊन आकांक्षा हिला सोबत घेत अंतुर्ली पोलीस स्टेशन गाठले.
त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे आकांक्षा मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर रावेर पोलीस स्टेशन येथे भारत म्हसाने यांनी संशयित आरोपी अजय घेटे आणि पत्नी माधुरी म्हसाने-घेटे यांच्या विरोधात फिर्याद दिली. दरम्यान या धक्कादायक खुनामुळे रावेर शहर हादरले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ हे घटनेचा तपास करीत आहे.