पीडित कुटुंबियांना २ लाखांची पालकमंत्र्यांकडून मदत जाहीर
रावेर/ जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतातील घरामध्ये चार भावडांचा कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याची निर्घृण घटना आज शुक्रवारी दि. १६ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेचा तपास लावण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महासंचालकाच्या सुचनेनूसार पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुढें यांनी पोलीस दलाचे तीन पथक तयार केले होते. तसेच आरोपीच्या शोधासाठी मध्यप्रदेश येथे एक तर दोन पथके इतर दोन ठिकाणी रवाना झाली होती. यानुसार रात्री उशिरा ५ संशयित आरोपिंना अटक करण्यात आले असून त्यातील तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचें विश्वसनिय सूत्रांकडून माहिती मिळाली. दरम्यान मयताच्या कुटुंबियांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
रावेर शहरालगत बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दांपत्य राहतात. ते आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील गढी ( जि.खरगोन ) येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. घरात सईता ( वय १३ वर्ष) रावल ( वय ११ वर्ष ) अनिल ( वय ८ वर्ष) आणि सुमन (वय ३ वर्ष ) या चौघां भावंडाचा खून कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली. गंभीर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलिस अधिकारी हे देखिल घटनास्थळी हजर झाले होते. तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनी देखील घटनेची माहिती घेवून पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना तपासाच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधिक्षकांनी एसआरटी पथक, तसेच चार प्रथम दर्जाचे पोलिस निरीक्षक, फॅारेन्सीक, श्वान पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आदी पथकांकडून या घटनेचा तपास वेगाने सुरु केला होता.
घडलेली घटना गंभीर असून चार ही मुलांची हत्या ही कुऱ्हाडीने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती . येथे कुऱ्हाड घरातच सापडली असून याबाबत फॅारेन्सीक पथक, फिंगर प्रिंट, श्वान पथकाकडून तपास सुरू झाला आहे, असे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. सदर घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच या प्रकरणी तातडीने संशयित आरोपींना शोधा आणि त्यांना अटक करून आणा असे आदेश त्यांनी तपास यंत्रणेला दिले. दरम्यान यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी उपस्थित होते.
दरम्यान, संध्याकाळी उशिरा तपास यंत्रणेने पावरा समाजातील एका हॉटेलमध्ये काम करणारे ५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी तिघे मयताच्या समाजाचे असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांकडून कळले आहे.
अशी घडली घटना
मयत मुलांचे आई वडील हे शेतात राहतात. संशयित तिघे आरोपी व पीडित कुटुंबीय एकाच समाजाचे आहेत. संशयित आरोपींना माहित होते कि, मुलांचे आई, वडील दशक्रिया विधीला जाणार आहेत. म्हणून रात्रीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्याचे तिघांनी ठरविले. त्यानुसार रात्री तिघा संशयितांनि घराची खिडकी तोडून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिचे इतर दोन भाऊ व बहीण यांनी देखील ताईच्या मदतीला धावून आले. त्यात संतापलेल्या तिघा संशयितांनी भीषण क्रौर्य करीत चौघा भावांना एका मागोमाग एक कुऱ्हाडीने वार करीत ठार केले. हे सर्व संशयित आरोपी २१ ते २३ वयोगटाचे असल्याचे सूत्रांकडून समजून आले आहे.
असा लागला तपास
दरम्यान, चौघा निष्पाप बालकांचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवीत तपासाला सुरुवात केली. त्यात श्वानपथकाला देखील पाचारण केले होते. घटनास्थळी पोलिसांच्या श्वानाने घटनेत वापरलेली कुऱ्हाडीचा वास घेत धावत सुटला. थेट परिसरातील एका हॉटेलमध्ये संशयित आरोपींजवळच येऊन थांबला. त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला. त्यांना ताब्यात घेतले असता आणि पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, संध्याकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रावेर येथे भेट दिली. घटनेची माहिती जाणून घेतली. संशयित तिघा आरोपींना अटक केली असल्याचे सांगितले. घटना क्रूरपणे झाली असून पोलीस यंत्रणेने झोकून दिले आहे. जलदगती न्यायालयात हा खटला चालणार असून उज्ज्वल निकम याना हा खटला चालविण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. चंद्रकांत पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, जिल्हा उपसंघटक रवींद्र पवार, तालुका प्रमुख योगीराज पाटील, अशोक शिंदे, नितीन महाजन, राकेश घोरपडे आदी उपस्थित होते. शनिवारी १७ रोजी गृहमंत्री अनिल देशमुख हे रावेर येथे पीडीत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार आहे.