चोपडा तालुक्यातील लासुर रस्त्यावरील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : बडवानीहून चोपड्याकडे येत असताना लासुर रस्त्यावर झाड आडवे लावून कार अडवली आणि हल्ला करुन आजच्या काचा दरोडेखोरांनी फोडल्या. लुटमारीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याचवेळी मागुन दुसरी कार आल्याने हल्लेखोर पळून गेले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री तालुक्यातील लासुर रोडवर घडली. या प्रकरणी अज्ञात सहा दरोडेखोरांवर चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार अशोक पाटील (वय ३०, रा. बलवाडी ता. वरला जि. बडवानी) हे औषध विक्री व्यवसायक व पाच जण कारने परत येत होते. बडवानी, मध्य प्रदेश येथून चोपड्याकडे येत असताना लासूर रस्त्यावर तीन किमी अंतरावर नवल नदीजवळ मंगळवारी मध्यरात्री १२:१० वाजता अज्ञातांनी त्यांची कार क्रमांक (एमपी ०९ झेड एम १६९५) ला अडविले. लाकडी दांडके आणि कुऱ्हाडीने हल्ला करून काचा फोडत लुटमारीचा प्रयत्न केला. मात्र अचानक मागून येणाऱ्या दुसऱ्या कारचा प्रकाश दरोडेखोरांवर पडला. त्यामुळे दरोडेखोर पसार झाले.
घटना समजल्यानंतर चोपडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनेचा तपास चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे हे करीत आहे. मागून वाहन आल्याने सदर दरोडेखोरांचा प्रयत्न फसला असल्याने ते पसार झाले. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी तुषार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४) (५. ३१२, ३२४, (४, (५) प्रमाणे अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय जितेंद्र वालटे करीत आहेत.