भुसावळ तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मागणी ; रास्ता रोको
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील खंडाळा, मोंढाळा आणि इतर काही गावांमध्ये एसटी बस थांबत नसल्याने तसेच फेऱ्या कमी असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. गुरुवारी दि. १८ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करीत याबाबत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता या समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केले आहे.
भुसावळ तालुक्यात अनेक विद्यार्थी हे एसटी बसने ये-जा करीत असतात. खंडाळा, मोंढाळा तसेच आजूबाजूच्या गावांमधील विद्यार्थ्यांना मोठ्या गावातील शाळांमध्ये जाण्यासाठी एसटी बसच्या फेऱ्या कमी असल्यामुळे तसेच आहे त्या एसटी बस थांबत नसल्यामुळे वेळेवर शाळेत जाता येत नाही.(केएएन)त्यामुळे त्यांचे शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील एसटीच्या विभागाला पत्र दिले होते. मात्र आम्ही एसटीच्या फेऱ्या वाढवण्याबाबत प्रयत्न करीत आहोत एवढेच आश्वासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मात्र त्यात कुठलीही प्रगती नाही. या मागणीकडे आता भुसावळच्या तहसीलदार आणि जळगावचे जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी विद्यार्थी मोहन सोनार, आकांक्षा पाटील, सचिन पाटील, नयना पवार, नीता मांडोळे, सुशांत देशमुख, निरंजन निकुंभ, स्नेहा पाटील, स्नेहल परदेशी, रक्षा चौधरी, कांचन चौधरी, हर्षदा बोंडे, प्रतीक्षा जावळे आदी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.