पारोळा ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -६ चे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा आणि दर्जेदार आणि जलद गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात याव्या अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे काम रखडले आहे.नागरिकांची गैरसोय होत आहे. अजंग ते तरसोद पर्यंतच्या अंतरात रहदारी मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक अपघात होतात. रस्त्याची दुरावस्था झाली असून महामार्गावर खड्डे आहेत. रात्रीचा प्रवास करणे अत्यंत जिकरीचे झालेले आहे.
सध्या सुरू असलेल्या कामात धुळे- जळगांव दरम्यान एखादा टप्पा पूर्ण झाला कि तो रहदारीस मोकळा करण्यात येतो परंतु निकृष्ट कामामुळे नवा रस्ता देखील काही दिवसांनी जुन्या रस्त्यापेक्षा खराब होत आहे.कामदेखील अत्यंत संथ गतीने सुरु आहे. नवीन रस्त्यालादेखील खड्डे पडले आहेत.वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी काम सुरु असल्याचे फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह नाही. त्यामुळे रात्री अपघात होवून जीवितहानी होत आहे. रस्त्यासाठी गौण खनिजाचे खोदकाम खदानीत न करता मक्तेदार सोयीच्या कुठल्याही जागी खोदकाम करीत असतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला खड्डे होवून पावसाचे पाणी साचून रहदारीचा अंदाज येत नसतो.
रस्त्याचे काम निकृष्ट असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना व जनतेला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित ठेकेदारासह अधिकाऱ्यांना योग्य आदेश निर्गमित करून निकृष्ट कामाची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी भारत सरकारचे रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचेकडे केलेली आहे.