मुंबई (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, कमी वयात मोठी जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी टाकल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच, आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला अपेक्षित यश आलं नसून केवळ ५० जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला केवळ १० जागांवर यश मिळाले. त्यामुळे, महायुतीमधील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढे संख्याबळ नाही. मात्र, महाविकास आघाडीमधील पक्षांकडून विधिमंडळ गटनेते आणि प्रतोदपदी पक्षातील नवनिर्वाचित आमदारांची नियुक्ती केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत बैठक घेऊन गटनेता व प्रतोद यांची निवड केली होती. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही गटनेता, मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत आज निर्णय झाला नाही.