चाळीसगाव तालुक्यातील घटनेनंतर ४ पिंजऱ्यासह लावले १० ट्रॅप कॅमेरे
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यात ४ वर्षीय बालकावर झडप घालत त्याचा बळी घेणाऱ्या बिबट्याला कैद करण्यासाठी एक पथक सक्रिय झाले आहे. तसेच बिबट्याला हेरण्यासाठी या वनपरिक्षेत्रात चार पिंजऱ्यांसह १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, मयत बालकाच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्यावतीने मदत दिली जाणार असून त्यानुसार वनविभागाने प्रस्ताव सादर केला आहे.
गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रांजणगाव शिवारात पुष्कर रवींद्र चव्हाण यांच्या शेतात काम करणाऱ्या कांजा ऊर्फ काशीराम पावरा यांच्या चार वर्षांच्या मुलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालत ठार केल्याची घटना घडली होती. यात रसेला या बालिकेचा मृत्यू झाला होता, या घटनेनंतर उपवनसंरक्षक प्रवीण ए., सहायक वनसंरक्षक अमोल पंडित, परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रस्ताव सादर केला. त्यानुसार स्थानिक प्रशासनाला मंजुरी मिळाल्यानंतर एक पथक वनपरिक्षेत्रात बिबट्यावर नजर ठेवून आहे. बिबट्याला लवकरच जेरबंद केले जाईल, असा विश्वास स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे.