शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “राष्ट्रीय पॅथॉलॉजी दिवस” उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विकृतीशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय पॅथॉलॉजी दिवस साजरा करण्यात आला. याकरिता विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत त्यांचे कौशल्य दाखवले.
भारतातील विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) चे आद्य जनक डॉ. व्ही आर खानोलकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय पॅथॉलॉजी दिवस साजरा केला जातो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पॅथॉलॉजी दिवसानिमित्त रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व, पोस्टर्स अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच ‘ड्रामालॉजी ऑफ पॅथोजेन्स’ हे पथनाट्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सादर करीत पॅथॉलॉजी विषयी जनजागृती केली.
रांगोळी स्पर्धेमध्ये १२ स्पर्धकांनी तर वक्तृत्व स्पर्धेत ९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यासह ११ जणांनी विविध पोस्टर्स तयार करून वैद्यकशास्त्रात पॅथॉलॉजीचे महत्व काय असते हे अधोरेखित केले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी पॅथॉलॉजी दिवसानिमित्त केक कापला. यानंतर पॅथॉलॉजी विभागातर्फे महाविद्यालयातील रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर पार पडले. त्यात ३८ विद्यार्थी व प्राध्यापकांनी रक्तदान केले.
सर्व कार्यक्रम अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक शेजवळ, प्रा. डॉ. भरत बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कुणाल देवरे, डॉ.शीतल घुगरे, डॉ. पूजा खांडवे, डॉ. निकिता कुचर, डॉ. प्रेरणा गायकवाड, डॉ. नम्रता वाघ, डॉ. श्रद्धा पैठणकर, डॉ. मिनू वर्गीस, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. श्यामली नावडे, डॉ. भावेश खडके आदींनी परिश्रम घेऊन यशस्वी केले.