नूतन महापौर दीपमाला काळे यांचा कौतुकास्पद पुढाकार
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव महानगरपालिकेच्या १७ व्या नूतन महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या महापौर पदाच्या कारकीर्दीची सुरुवात एका अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाने केली आहे. कोणत्याही थाटामाटापेक्षा सामाजिक बांधिलकीला महत्त्व देत, त्यांनी माधवराव गोळवलकर रक्तपेढीमध्ये रक्तदान केले. आपल्या कृतीतून त्यांनी संपूर्ण शहरासमोर एक नवा आदर्श ठेवला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


राजकीय पदाची शपथ घेतल्यानंतर सामान्यतः जल्लोष केला जातो; मात्र महापौर दीपमाला काळे यांनी या परंपरेला छेद दिला. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आपली जबाबदारी स्वीकारताना त्यांनी रक्ताची गरज ओळखून प्रबोधनात्मक पाऊल उचलले. रक्तदान करताना नगरसेविका सुचिता हाडा, केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव दिलीप चोपडा, डॉ सई नेमाडे, लॅब टेक्निशियन जागृती लोहार, उज्ज्वला पाटील, व्यवस्थापक भानुदास येवलेकर उपस्थित होते.

महापौर दीपमाला काळे या केवळ राजकारणातच नव्हे, तर सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांतही नेहमीच अग्रेसर असतात. रनर्स ग्रुप आणि सायकलिंग असोसिएशनच्या माध्यमातून त्या शहरात आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करत असतात. धार्मिक, सामाजिक उपक्रम आणि महिलांचे संघटन हे त्यांच्या समाजसेवेचे मुख्य केंद्र राहिले आहे.
प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात अशा पवित्र कार्याने केल्यामुळे जळगावच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “लोकप्रतिनिधीने समाजासमोर कोणता आदर्श ठेवावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.









