जळगाव मेडिकल कॉलेजच्या जागेवरची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चिंचोली शिवारातील वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून बांधकामाच्या साहित्याचा २५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. दरम्यान, हि चोरी उघड झाली असून तेथील रखवालदार तरुणांनी व ठेकेदाराकडील चालकानेच चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सोमवारी ११ डिसेंबर रोजी संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
तालुक्यातील चिंचोली शिवारात सर्व पॅथींचा समावेश असलेल्या वैद्यकीय संकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवण्यात आले असून स्टोअर किपरही कार्यरत आहे. ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी काम थांबल्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी चॅनल, रॉड, स्केअर ट्यूब असे एकूण २५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार शनिवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले. स्टोअर किपर नितीन धाईतडक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन संशयितांना केली अटक
या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला. काही इसमाची चौकशी केली. त्यातून बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे गौरव कैलास चव्हाण (वय १९) व दीपक भावलाल नन्नवरे (वय २७, दोन्ही रा. मोहाडी ता. जळगाव) यांनीच हि चोरी केल्याचे तपासात दिसून आले आहे. दरम्यान, या दोघांना बांधकामाच्या ठिकाणावरील ठेकेदाराकडचा चालक उमेश विनोद चव्हाण (वय २५, रा. उमाळा, ता. जळगाव) याने मदत केल्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.