महिला व बाल विकास विभागाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृहाने ‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ या राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. रूपये वीस हजारांचा धनादेश व लॅपटॉप बक्षिस स्वरूपात देण्यात आला आहे .
महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात कार्यरत सर्व बालगृहातील बालकांसाठी ‘केयर फॉर यु’ या संस्थेमार्फत (जनरल नॉलेज ) सामान्य ज्ञानाच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक फेरी जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आली. यात महाराष्ट्रातील सर्व कार्यरत बालगृहातील बालकांनी सहभाग नोंदविला होता. पहिल्या फेरीत २० बालगृहातील बालकांच्या गटांची निवड करण्यात आली होती. २२ एप्रिल २०२३ रोजी २० बालगृहांची द्वितीय फेरी पुणे येथे घेण्यात आली त्यापैकी १० बालगृहांची निवड अंतिम तिसऱ्या फेरीसाठी करण्यात आली होती. २० ऑगस्ट २०२३ रोजी अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या १० बालगृहांची पुणे येथे सेमी फायनल राऊंड घेण्यात आला. त्यात १० पैकी ६ बालगृहांची निवड फायनल राऊड साठी करण्यात आली. ०६ बालगृहांपैकी ३ बालगृहांची अंतिम निवड चाचणी घेवून निवड करण्यात आली.
या स्पर्धेत सामान्य ज्ञान चाचणीसाठी बालिकांनी इंडियन फॅक्टस फाईल, इंडियन इकॉनॉमी या विषयांची निवड केली होती. बालगृहातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्ग गटातील मुलींचा संघ सहभागी झाला होता. बालगृहातील अधीक्षका जयश्री पाटील व महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेच्या यशासाठी कष्ट घेतले. संस्थेच्या मुलींच्या संघाने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी मुलींचे कौतूक करत अभिनंदन केले आहे.