राजनंदिनी फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात
डॉ. महेंद्र काबरा यांचे आश्वासन
जळगाव (प्रतिनिधी) – राजनंदिनी बहुद्देशिय संस्था आणि डॉ.एन.एम.काबरा फाउंडेशन यांच्यातर्फे महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील कंत्राटी वर्ग चारमधील सुरक्षा अधिकारी, स्वच्छता अधिकारी, रुग्णालयातील दाखल कोरोना रुग्णांना जेवण वाटप करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आदींचा प्रातिनिधिक स्वरुपात काबरा फाउंडेशनच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल, ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, प्रा.डॉ.संगीता गावित, साई ग्रुपचे व्यवस्थापक प्रवीण पाटील, विनय काबरा, काबरा फाउंडेशनचे चेअरमन डॉ. महेंद्र काबरा, ममता काबरा, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ उपस्थित होत्या. संस्थेतर्फे प्रा.डॉ.संगीता गावित यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रुग्णालयामधील कंत्राटी वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी आणि हेल्थ कार्डची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन फाउंडेशनचे चेअरमन डॉ. महेंद्र काबरा यांनी दिले.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि त्या रुग्णांच्या म्रुत्येचे प्रमाण आता झपाट्याने कमी होत आहे. परिस्थिती नियंत्रणात येत आहे. यात आरोग्य यंत्रणा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील शायकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच कंत्राटी वर्ग चारमधील सर्व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. हे कर्मचारी देखील जिवाची बाजी लावून कोरोना रुग्णांची रात्रंदिवस सेवा करीत आहेत. त्यांच्या या जिकरीच्या कामाची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ, सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले. तर आभार डॉ.यशोवर्धन काबरा यांनी मानले. या उपक्रमाला गौरी उद्योग समूह आणि मराठा कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील यांचे सहकार्य लाभले.







