लोकसभेसाठी रावेरमधून उमेदवारीही मिळाली !
उद्धव ठाकरेंनंतर पवारांचा ‘पॉवर’ गेम, मविआचा भाजपाला पुन्हा धक्का
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा सस्पेन्स अखेर संपला असून रावेर येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे पदाधिकारी श्रीराम पाटील यांच्या नावाची सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत घोषणा केली. श्रीराम पाटील यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शरद पवारांनी पॉवर गेम खेळून भाजपाला महाविकास आघाडीतर्फे मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता भाजपच्या रक्षा खडसे यांची राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटील यांच्यासोबत काट्याची टक्कर होणार आहे.
पुण्यातील बैठकीत माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र भय्या पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यावेळी पक्षाने दिलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. नियोजन सुरु करा असे मार्गदर्शन यावेळी शरद पवार यांनी केले.
श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यामुळे पक्ष अधिक बळकट होणार आहे. आता उमेदवार जाहीर झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सह मित्र पक्ष शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस पक्ष व इतर हे आता प्रचारासाठी जोमाने कामाला लागणार आहेत. दरम्यान श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीमुळे आता एकनाथराव खडसेंना तसेच भाजपाला उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार अशी चिन्हे दिसून येत आहेत.