हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये बंद खोलीत गुफ्तगू : प्रभाग ७ सह ३ जागांसाठी अडले घोडे
जळगाव (विशेष प्रतिनिधी) आज रविवारी दुपारी सोशल मीडियामध्ये वृत्तांकनात अग्रेसर असलेल्या “केसरीराज”ने ‘महायुती फिस्कटली : भाजप स्वबळावर लढणार’ असे वृत्त दिले होते. संध्याकाळी या वृत्तामुळे महायुतीमधील घटक पक्ष जागी झाले. आता रात्री ९ वाजता त्यांनी हॉटेल रॉयल पॅलेस येथे एकत्रित बैठक बोलावली. आता या ठिकाणी सेनेचे पदाधिकारी चर्चा करून निघून गेले असुन भाजप राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे. तीन जागांवरून तिघा पक्षांमध्ये ताणाताणी सुरू आहेत. यात आ. भोळे यांचा प्रभाग ७ मधील जागेचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ सोमवार आणि मंगळवार अशी दोनच दिवस शिल्लक आहेत. यातच आता महाविकास आघाडीने जागा वाटपाचे सूत्र निश्चित केले आहे. मात्र भाजपाकडून अद्यापही कोलांटऊड्या सुरूच आहेत. दुपारी अजिंठा विश्रामगृहात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये होणारी चर्चा नकारात्मक झाली आणि महायुती फिस्कटली होती. यात राष्ट्रवादीला सन्मानजनक स्थान मिळत नसल्यामुळे ही महायुती होणार नाही हे जवळपास निश्चित झाले. भाजप ७५ जागा स्वबळावर लढल्यास मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा तो जिंकून येऊ शकतो हे चित्र जवळपास स्पष्ट झाले होते.
याबाबतचे वृत्त फक्त “केसरीराज”ने सर्वात आधी एक्सक्लुझिव्ह प्रसारित केल्यानंतर भारतीय जनता पक्षासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये एकच खळबळ उडाली होती. यामध्ये नेत्यांनी पुन्हा एकमेकांशी संपर्क साधणे सुरू केले. त्यातच महायुती नाही म्हटल्यावर राष्ट्रवादीची अवस्था अधिकच बिकट झाली. त्यामुळे आता आज रात्री ९ वाजता हॉटेल रॉयल पॅलेस येथे पुन्हा एकदा तिघा पक्षांची एकत्रित बैठक सुरू झाली. सुरुवातीला शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी चर्चेत सहभाग घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली.

२५ जागा आम्हाला हव्यात यासाठी आग्रह देखील धरल्याची माहिती मिळाली. मात्र राष्ट्रवादीला जागा सोडायचे असल्यास सेनेला २५ जागा देता येणार नाही ही अडचण भाजपची होती. काही वेळानंतर सेनेचे दोन्ही पदाधिकारी हॉटेल रॉयल पॅलेस इथून निघून गेले. आता भाजपचे निवडणूक प्रमुख आ. राजूमामा भोळे, निवडणूक प्रभारी आ.मंगेश चव्हाण, महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, महानगर प्रमुख अभिषेक पाटील यांच्यामध्ये जागावाटप सूत्राबाबत आणि उमेदवारी देण्याविषयी बंद खोलीत चर्चा सुरू आहे.
सोमवारी महायुतीमधील नेते कोणाला एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर करतात, याकडे आता निष्ठावंत कार्यकर्त्यांसह आयाराम गयाराम यांचे लक्ष लागून आहेत. अनेक जणांनी देव पाण्यात ठेवले असून काहींनी तर अपक्ष निवडणूक लढवण्याविषयी निर्णय घेतला असल्याची माहिती ‘केसरीराज’कडे आली आहे. महाविकास आघाडीची यादी सोमवारी दुपारी जाहीर केली जाण्याची माहिती देखील “केसरीराज”ला मिळाली आहे.








