पवार यांच्यासह खा. उन्मेष पाटील यांचाही पक्षप्रवेश, मुंबईत भेटी सुरु
स्मिता वाघ यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचे शेकडो कार्यकर्ते नाराज
मुंबई (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच खा. संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक झाली . या बैठकीत जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पारोळा येथील भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांचे नाव अंतिम झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान खा. उन्मेष पाटील यांच्यासह करण पवार यांनी शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांची मंगळवारी २ एप्रिल रोजी भेट घेतली. बुधवारी लोकसभेसाठी करण पवार यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. स्मिता वाघ यांच्या उमेदवारीमुळे शेकडो भाजपचे कार्यकर्ते नाराज झालेले आहे.
सध्या भाजपचे करण पवार, भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील या दोघांची नावे आघाडीवर आहेत. यात खा संजय राऊत यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पारोळा येथील भाजपचे करण पवार यांचे नाव निश्चित झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवारांबाबत सस्पेन्स कायम आहे.
जळगाव लोकसभेतून उमेदवारीसाठी हर्षल माने, कुलभूषण पाटील, ललिता पाटील यांच्या नावांसह भाजपचे खासदार उन्मेष पाटील, उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, करण पवार यांचीही नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, डॉ. उत्तमराव महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. याबाबत करण पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा दुजोरा दिला असून उद्या अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती त्यांनी फोनवरून बोलताना दिली आहे.
करण पवार हे पारोळा नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. मंगळवारी दि.२ एप्रिल रोजी खा. उन्मेश पाटील, करण पवार यांनी खा. संजय राऊत यांची भेट घेतली. याबाबत माध्यमांनी त्यांना विचारले असता, आमची राजकीय मैत्री आहे. आम्ही मैत्री म्हणून भेटायला गेलो होतो. एवढेच माध्यमांशी बोलताना सांगितले आहे, गुरुवारी दि. ३ एप्रिल रोजी उन्मेष पाटील आणि करण पवार यांचा पक्षप्रवेश होणार असून उमेदवाराची देखील बुधवारी घोषणा होईल, अशी माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सूत्रांनी दिली आहे.
करण पवार हे सुशिक्षित उमेदवार असून लोकसभेसाठी ते सक्षम आहेत. अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवाराबाबत सुरू असलेला शोध आता संपलेला आहे.
दुसरीकडे स्मिता वाघ यांच्या उमेदवारीमुळे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये नाराज झालेले आहेत. याबाबतची नाराजी त्यांनी पक्ष नेत्यांकडे वारंवार सांगितली आहे. मात्र तरी देखील कार्यकर्त्यांच्या भावनांना कुठेही लक्षात घेण्यात आलेले नाही. स्मिता वाघ यांची उमेदवारी कायम आहे. स्मिता वाघ यांची अमळनेर वगळता कुठेही लोकप्रियता नाही. याकडे देखील कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. मात्र पक्ष नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीकडे कानाडोळा केलेला आहे.
तसेच कार्यशील असलेले व पहिल्यांदा संधी दिलेली असतानाही लोकप्रिय काम करणारे उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारली. तेथेच कार्यकर्त्यांना भाजपचे इरादे दिसून आले.