मुलीसोबत राहणारे एकनाथराव, आता सुनेचा करणार प्रचार
भाजप उमेदवारांच्या प्रचारात खडसे-महाजन एकत्र दिसतील काय ?
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ राजकीय व्यक्तिमत्व असलेले एकनाथराव खडसे यांचा संभाव्य भाजपा प्रवेश हा जिल्ह्यासह राज्यात थट्टेचा विषय ठरतोय असे चित्र दिसून येत आहे. एकीकडे खडसे म्हणतात, १५ दिवसांनी दिल्लीतच माझा पक्षप्रवेश होणार. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी, त्यांच्या पक्ष प्रवेशाचा विषय केंद्रीय समितीकडे आहे असे सांगितले. जिल्ह्यातील खडसेंचे हाडवैरी गिरीश महाजन यांनी मात्र त्यांना डिवचत, खडसे हे मोदी, शहा, नड्डा यांच्याचकडे जातात. तेथेच त्यांचे संबंध असून तिथेच बोलणी सुरु आहे अशा शब्दात चिमटा काढला आहे. एकनाथरावांच्या रावेर लोकसभा मतदारसंघात तर, खडसेंच्या ‘पलटी’ मुळे त्यांचे कार्यकर्ते पुरते गोंधळून गेले आहेत. तर नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षात विविध पदांसह मंत्रीदावर काम केले आहे. २०२० साली ते भाजप सोडून शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. तीन वर्ष त्यांनी राष्ट्रवादीत काम केले. विधानपरिषदेचे गटनेते म्हणून विरोधी गटाकडून भूमिका मांडली. मात्र आता लोकसभेच्या तोंडावर महिनाभरापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन टाकला. त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याबाबत सांगितले. येत्या १५ दिवसांत दिल्लीत भाजपप्रवेश होणार असे त्यांनी सांगितले. आता तर हे १५ दिवस संपूनसुद्धा गेले आहेत. तसेच, पक्षातील जुन्या सहकार्यांनी गळ घातली म्हणून मी माझ्या पूर्वीच्या घरी जातोय असे खडसे म्हणाले. पण त्यांच्या या भूमिकेविषयी शंका निर्माण झाली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघासह सर्वच राजकीय पक्षात खडसेंच्या भूमिकेविषयी विविध तर्क लावले जात आहेत. गेल्या तीन वर्षात मुलगी रोहिणी खेवलकर-खडसेंसोबत दिसणारे एकनाथराव आता सून व भाजपाची उमेदवार रक्षा खडसे हिला पुन्हा खासदार होण्यासाठी आशीर्वाद देऊ लागले आहेत. तसेच, जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे पत्रकारांना त्यांनी सांगितले आहे. असे झाले तर ते नेमका प्रचारात कसा सहभाग घेतील ? सभांना जाणार का ? त्यांचे हाडवैरी असणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह ते प्रचार करतील काय ? असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले जाऊ लागले आहेत. राष्ट्रवादी सोडल्यामुळे आता खडसेंचे हसे होऊ लागले अशी दबकी प्रतिक्रिया मतदारसंघातून उमटत आहे.