जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांचाही समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : महायुतीचे जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार हे उद्या गुरुवारी दि. २५ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करणार आहेत. याकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहजिल्ह्यातील तिन्ही मंत्री शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांचीही उपस्थिती राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्व उमेदवारांचा जोरात सुरु असून आता नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजपाचे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार स्मिता वाघ व रक्षा खडसे यांचा उद्या दि. २५ एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज भरला जाणार आहे. त्यांची शहरातील शिवतीर्थ येथून नामांकन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. आ. मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे, आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, आ. लता सोनवणे, आ. संजय सावकारे यांच्यासह जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.