असे का म्हणताहेत ताईंचे समर्थक ? उमेदवारीवर समर्थक ठाम
रावेर लोकसभा मतदारसंघात राजकारण तापले आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रक्षाताई खडसेंना तिसऱ्यांदा तिकीट मिळाले आहे. दुसरीकडे मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून खडसे परिवाराच्या माघारीनंतर अजून उमेदवार चाचपणी सुरु आहे. मात्र त्याआधीच आपल्याला शरद पवार साहेबानी हिरवा कंदील दिल्याचे सांगत भुसावळ येथे माजी आ. संतोष चौधरी उत्साही झाले आहेत. तर इतर विविध पक्षदेखील उमेदवारीकरिता कामाला लागले आहे. रावेर मतदारसंघात डॉ. केतकी पाटील यांनी लोकसभेकरिता जय्यत तयारी सुरु केली होती. मात्र भाजपने पुन्हा रक्षा खडसेंनाच तिकीट मिळाल्याने त्यांच्यासह समर्थकांची नाराजी दिसून येत आहे.
‘केसरीराज’ने डॉ. केतकी यांच्या समर्थकांशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. त्यांच्याकडून मिशन इलेक्शन बाबत जाणून घेतले. ते जराही उत्साही दिसून आले नाही. डॉ. केतकी यांना तिकीट भाजपने द्यायला हवे होते. आम्ही आजही आशावादी आहोत. केतकीताईला तिकीट द्यायलाच पाहिजे. आम्ही गेल्या वर्षभरापासून केतकीताईसाठी मतदारसंघातल्या तालुक्यात काम करीत असून स्वतः डॉ. केतकी यांनीही जनतेशी संपर्क करीत लोकप्रियता मिळविली आहे. केवळ वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतीक या मुद्द्यांवरच नाही तर लोकप्रशासनिक प्रत्येक मुद्द्यावर केतकीताई हात घालून जनतेला न्याय देण्याबाबत काम करीत आहेत.
डॉ. केतकीताई यांना तिकीट न मिळाल्याने समर्थक निराश झालेले आहेत. केतकीताई अजून तुम्ही थांबून घ्यायला हवे होते. उमेदवार जाहीर झाल्यावर मग भाजपात जावे कि नाही हा निर्णय घ्यायला हवा होता असे मत समर्थकांनी व्यक्त केले आहे. चोपडा,यावल, रावेर, मलकापूर, भुसावळ येथे ताईंचे मोठे समर्थक आहेत. त्यामुळे समर्थकांना अजूनही आशा आहे. भाजपने यंदा उमेदवार बदलावा, डॉ. केतकी पाटील यांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन संधी द्यावी असे समर्थक कार्यकर्ते म्हणत आहेत. त्यामुळे आजही समर्थक डॉ. केतकी यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत.