चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात शोककळा
जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव देशमुख (वय अंदाजे ६० वर्षे) यांचे आज मंगळवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राजीव देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून अल्पशा आजाराने त्रस्त होते. मात्र आज सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने धुळे येथे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चाळीसगाव तालुका व परिसरात शोककळा पसरली. राजीव देशमुख यांनी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. स्थानिक विकासकामांपासून शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ते नेहमीच पुढाकार घेत असत.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेला ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज संध्याकाळी चाळीसगाव येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. राजीव देशमुख यांच्या निधनाने चाळीसगाव तालुक्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली असून, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.









